Shree Gurucharitra Adhyay 14 | श्री गुरुचरित्र आध्याय १४ - ओवी सह | सर्व संकट हरण करणारा आध्याय

 Shree Gurucharitra Adhyay 14 | श्री गुरुचरित्र आध्याय १४ - ओवी सह | सर्व संकट हरण करणारा आध्याय


श्रीगुरुचरित्र अध्याय १४

श्री गणेशाय नमः I श्रीसरस्वत्यै नमः I श्रीगुरुभ्यो नमः I नामधारक शिष्य देखा I विनवी सिद्धासी कवतुका I प्रश्न करी अतिविशेखा I एकचित्ते परियेसा II १ II जय जया योगीश्वरा I सिद्धमूर्ति ज्ञानसागरा I पुढील चरित्र विस्तारा I ज्ञान होय आम्हांसी II २ II उदरव्यथेच्या ब्राह्मणासी I प्रसन्न जाहले कृपेसी I पुढे कथा वर्तली कैसी I विस्तारावे आम्हांप्रति II ३ II ऐकोनि शिष्याचे वचन I संतोष करी सिद्ध आपण I गुरुचरित्र कामधेनु जाण I सांगता जाहला विस्तारे II ४ II ऐक शिष्या शिखामणि I भिक्षा केली ज्याचे भुवनी I तयावरी संतोषोनि I प्रसन्न जाहले परियेसा II ५ II गुरुभक्तीचा प्रकारु I पूर्ण जाणे तो द्विजवरू I पूजा केली विचित्रु I म्हणोनि आनंद परियेसा II ६ II तया सायंदेव द्विजासी I श्रीगुरू बोलती संतोषी I भक्त हो रे वंशोवंशी I माझी प्रीति तुजवरी II ७ II ऐकोनि श्रीगुरुचे वचन I सायंदेव विप्र करी नमन I माथा ठेवून चरणी I न्यासिता झाला पुनःपुन्हा II ८ II जय जया जगद्गुरू I त्रयमूर्तींचा अवतारू I अविद्यामाया दिससी नरु I वेदां अगोचर तुझी महिमा II ९ II विश्वव्यापक तूंचि होसी I ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी I धरिला वेष तूं मानुषी I भक्तजन तारावया II १० II तुझी महिमा वर्णावयासी I शक्ति कैंची आम्हांसी I मागेन एक आता तुम्हांसी I तें कृपा करणे गुरुमूर्ति II ११ II माझे वंशपारंपरी I भक्ति द्यावी निर्धारी I इहे सौख्य पुत्रपौत्री I उपरी द्यावी सद्गति II १२ II ऐसी विनंति करुनी I पुनरपि विनवी करुणावचनी I सेवा करितो द्वारयवनी I महाशूरक्रुर असे II १३ II प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी I घात करितो जीवेसी I याचि कारणे आम्हांसी I बोलावीतसे मज आजि II १४ II जातां तया जवळी आपण I निश्चये घेईल माझा प्राण I भेटी जाहली तुमचे चरण I मरण कैचे आपणासी II १५ II संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I अभयंकर आपुले हाती I विप्रमस्तकी ठेविती I चिंता न करी म्हणोनिया II १६ II भय सांडूनि तुवां जावे I क्रुर यवना भेटावे I संतोषोनि प्रियभावे I पुनरपि पाठवील आम्हांपाशी II १७ II जंववरी तू परतोनि येसी I असो आम्ही भरंवसी I तुवां आलिया संतोषी I जाऊ आम्हीं येथोनि II १८ II निजभक्त आमुचा तू होसी I पारंपर-वंशोवंशी I अखिलाभीष्ट तू पावसी I वाढेल संतति तुझी बहुत II १९ II तुझे वंशपारंपरी I सुखे नांदती पुत्रपौत्री I अखंड लक्ष्मी तयां घरी I निरोगी होती शतायुषी II २० II ऐसा वर लाधोन I निघे सायंदेव ब्राह्मण I जेथे होता तो यवन I गेला त्वरित तयाजवळी II २१ II कालांतक यम जैसा I यवन दुष्ट परियेसा I ब्राह्मणाते पाहतां कैसा I ज्वालारूप होता जाहला II २२ II विमुख होऊनि गृहांत I गेला यवन कोपत I विप्र जाहला भयचकित I मनीं श्रीगुरूसी ध्यातसे II २३ II कोप आलिया ओळंबयासी I केवी स्पर्शे अग्नीसी I श्रीगुरूकृपा होय ज्यासी I काय करील क्रुर दुष्ट II २४ II गरुडाचिया पिलीयांसी I सर्प तो कवणेपरी ग्रासी I तैसे तया ब्राह्मणासी I असे कृपा श्रीगुरुची II २५ II कां एखादे सिंहासी I ऐरावत केवीं ग्रासी I श्रीगुरुकृपा होय ज्यासी I कलिकाळाचे भय नाही II २६ II ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण I त्यासी कैंचे भय दारुण I काळमृत्यु न बाधे जाण I अपमृत्यु काय करी II २७ II ज्यासि नांही मृत्यूचे भय I त्यासी यवन असे तो काय I श्रीगुरुकृपा ज्यासी होय I यमाचे मुख्य भय नाही II २८ II ऐसेपरी तो यवन I अन्तःपुरांत जाऊन I सुषुप्ति केली भ्रमित होऊन I शरीरस्मरण त्यासी नाही II २९ II हृदयज्वाळा होय त्यासी I जागृत होवोनि परियेसी I प्राणांतक व्यथेसी I कष्टतसे तये वेळी II ३० II स्मरण असे नसे कांही I म्हणे शस्त्रे मारितो घाई I छेदन करितो अवेव पाही I विप्र एक आपणासी II ३१ II स्मरण जाहले तये वेळी I धांवत गेला ब्राह्मणाजवळी I लोळतसे चरणकमळी I म्हणे स्वामी तूंचि माझा II ३२ II येथे पाचारिले कवणी I जावे त्वरित परतोनि I वस्त्रे भूषणे देवोनि I निरोप दे तो तये वेळी II ३३ II संतोषोनि द्विजवर I आला ग्रामा वेगवत्र I गंगातीरी असे वासर I श्रीगुरुचे चरणदर्शना II ३४ II देखोनिया श्रीगुरूसी I नमन करी तो भावेसी I स्तोत्र करी बहुवसी I सांगे वृत्तांत आद्यंत II ३५ II संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I तया द्विजा आश्वासिती I दक्षिण देशा जाऊ म्हणती I स्थान-स्थान तीर्थयात्रे II ३६ II ऐकोनि श्रीगुरुंचे वचन I विनवीतसे कर जोडून I न विसंबे आतां तुमचे चरण I आपण येईन समागमे II ३७ II तुमचे चरणाविणे देखा I राहो न शके क्षण एका I संसारसागर तारका I तूंचि देखा कृपासिंधु II ३८ II उद्धरावया सगरांसी I गंगा आणिली भूमीसी I तैसे स्वामी आम्हासी I दर्शन दिधले आपुले II ३९ II भक्तवत्सल तुझी ख्याति I आम्हा सोडणे काय नीति I सवे येऊ निश्चिती I म्हणोनि चरणी लागला II ४० II येणेपरी श्रीगुरूसी I विनवी विप्र भावेसी I संतोषोनि विनयेसी I श्रीगुरू म्हणती तये वेळी II ४१ II कारण असे आम्हा जाणे I तीर्थे असती दक्षिणे I पुनरपि तुम्हां दर्शन देणे I संवत्सरी पंचदशी II ४२ II आम्ही तुमचे गांवासमीपत I वास करू हे निश्चित I कलत्र पुत्र इष्ट भ्रात I मिळोनी भेटा तुम्ही आम्हां II ४३ II न करा चिंता असाल सुखे I सकळ अरिष्टे गेली दुःखे I म्हणोनि हस्त ठेविती मस्तके I भाक देती तये वेळी II ४४ II ऐसेपरी संतोषोनि I श्रीगुरू निघाले तेथोनि I जेथे असे आरोग्यभवानी I वैजनाथ महाक्षेत्र II ४५ II समस्त शिष्यांसमवेत I श्रीगुरू आले तीर्थे पहात I प्रख्यात असे वैजनाथ I तेथे राहिले गुप्तरूपे II ४६ II नामधारक विनवी सिद्धासी I काय कारण गुप्त व्हावयासी I होते शिष्य बहुवसी I त्यांसी कोठे ठेविले II ४७ II गंगाधराचा नंदनु I सांगे गुरुचरित्र कामधेनु I सिद्धमुनि विस्तारून I सांगे नामकरणीस II ४८ II पुढील कथेचा विस्तारू I सांगता विचित्र अपारु I मन करूनि एकाग्रु I ऐका श्रोते सकळिक हो II ४९ II इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोSध्यायः II श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II



Comments

Popular posts from this blog

Shree Gurucharitra Adhyay 18 | श्रीगुरूचरित्र अध्याय (१८) अठरावा | सर्व मनोकामना पूर्ण करणारा आध्याय

घोरकष्टोधरणस्तोत्रम | घोरकष्टोद्धरण स्तोत्र ओवी सह| Ghorkashtodharan Stotra |